About Me

My photo
NASHIK, Maharashtra, India

19 July, 2023

चणकापूरची लढाई

 

हुतात्मा स्मारक

इंग्रज भारतात आले तेव्हा सुरुवातीच्या काळात साम्राज्यविस्तार करतांना अनेक भारतीय राजांवर, लोकांवर दडपशाहीचे धोरण अवलंबले होते. इंग्रजांनी अनेक स्थानिक राज्यकर्त्यांच्या हातून सत्ता काबीज केली आणि राज्यातील जनतेकडून जबरदस्तीने करवसुली करणे सुरु केले. लोकांवर अन्याय होऊ लागला. अनेकांच्या मनात संताप खदखदत होता पण क्रूर इंग्रजांविरुद्ध बंड करण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. पण काही शूरवीरांनी मात्र प्राणाची देखील पर्वा केली नाही आणि इंग्रंजांविरुद्ध बंड केले. त्यांपैकींच एक उठाव म्हणजे चणकापूरचा लढा.

सन १९३० मध्ये कळवण तालुक्यातील गिरणा नदीवर बांधण्यात आलेले चणकापूर धरण चणकापूर गावाच्या मधोमध असलेल्या टेकडीवर इंग्रजांविरुद्ध हा लढा घडून आला. चणकापूर पंचक्रोशीतील १० ते १२ हजार आदिवासी बांधव एकत्र झाले. सर्वसामान्य भोळ्याभाबड्या गरीब जनतेवर इंग्रजांनी केलेला अन्याय आणि अत्याचार सहन झाला नाही. सर्वांनी "जिंकू किंवा मरू" असा निर्धार करून हाती भाल्ले, तिरकमठा, आदी हत्यारे घेऊन तसेच मनात इंग्रज राजवटीबद्दलचा पराकोटीचा संताप, त्यात इंग्रजांविरुद्ध लढण्याची जिद्द, अशी सारी स्वातंत्र्यलढ्याची तयारी करून हि इंग्रज विरुद्ध आदिवासी लढाई त्या टेकडीवर घडून आली. या आदिवासी बांधवांच्या बलिदानाला राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासात मोठे महत्व देण्यात आले आहे.

हा आदिवासी बांधवांचा लढा उधळून लावण्यासाठी जुलुमी, अन्यायी इंग्रज सरकारच्या सैन्यांनी संपूर्ण टेकडीला चोहोबाजूंनी वेढा दिला. आदिवासींच्या लढण्याचा ठाम निश्चय बघून या इंग्रज फौजांनी हवेतच गोळीबार सुरु केला. त्याला आदिवासींनी चांगल्याप्रकारे प्रत्युत्तर दिले. हे प्रत्युत्तर देताच ब्रिटिशांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला आणि त्यात कित्येकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, चेंगराचेंगरी झाली, काही आदीवासी बांधवानी कड्यातून उड्या मारून घेतल्या, काहीजण तलावात बुडून मृत्युमुखी पडले,  कित्येकांना या लढ्यात वीरमरण आले. सुमारे दीड दिवस चाललेल्या या तुंबळ लढाईत शंभराहून अधिक आदिवासी बांधव इंग्रजांविरुद्ध लढता-लढता शहीद झाले.

या संग्रामासाठी (उठावासाठी) नेतृत्व करणाऱ्या सहा प्रमुख नेत्यांना ब्रिटीश सरकारने सश्रम कारावासाची शिक्षा केली. ह्या स्वातंत्र्य लढ्यात महिलाही मागे नव्हत्या. जवळजवळ चारशे महिलांना अटक झाली होती. या लढ्यानंतर संपूर्ण आदिवासीबहुल भागात ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढण्याचे रणशिंगच फुंकले गेले. प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढण्याचे धारिष्ट दाखवायला लागले.  स्वातंत्र्यासाठी जीव गमवावा लागला तरी चालेल पण अन्याय सहन करणार नाहीत, असा निर्धार करून पुरुष - महिला ब्रिटिश सरकार विरुद्ध लढण्यासाठी तयार झाले. ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या स्वरूपामध्ये स्वातंत्र्यासाठी लढे सुरु झाले. या लढयांद्वारे संपूर्ण देशात ब्रिटीश फौजांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलून आदिवासी बांधव शहीद झाले.

स्वातंत्र्यासाठी ज्या आदिवासी बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ या टेकडीजवळील चणकापूर ग्राम येथे शासनाने हुतात्मा स्मारकाची उभारणी केली आहे. हे हुतात्मा स्मारक सुमारे साडेचार एकर जमिनीवर असून ११९ मीटरचा चबुतरा आहे.  दरवर्षी ऑगस्ट ला क्रांतीदिनानिमित्ताने वीर हुतात्म्यांचे स्मरण होत असते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी ध्वजारोहण करून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. चणकापूर परिसरातील वातावरण निसर्गरम्य असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना आश्वासक शांततेचा अनुभव देतो.

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या पूर्वजांचा, आदिवासी बांधवांचा हा  ऐतिहासिक वारसा येणाऱ्या पिढीसाठी जपून ठेवावा तो टिकून राहावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा.

Reference by https://zpschoolsaptshrungigad.wordpress.com/

Nature

चणकापूरची लढाई

  हुतात्मा   स्मारक इंग्रज भारतात आले तेव्हा सुरुवातीच्या काळात साम्राज्यविस्तार करतांना अनेक भारतीय राजांवर , लोकांवर दडपशाहीचे ...

Historical Place